ठाणे- एका केटर्स मालकाच्या घरातून चोरट्यांनी तब्बल १४ लाखांच्या रोख रकमेसह १ लाखांचे सोन्याचे दागिने, असा एकूण १५ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
भिवंडीत केटर्स मालकाच्या घरातून तब्बल १५ लाखाचा ऐवज लंपास - Sidharth Kamble
चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडत आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉक तोडून १४ लाख रूपयाची रोकड आणि एक लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने,असा एकूण १५ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
ही घटना भिवंडी शहरातील कोंबड पाडा येथील शिवशक्ती बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यावर घडली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शोभा भिमसिंग राजपूत (वय ६० वर्षे) असे घरफोडी झालेल्या गृहिणीचे नाव आहे. त्यांच्या पतीचा भिमसिंग केटर्सचा व्यवसाय असून शोभा यांचे पती राजस्थान येथील मूळ गावी गेले आहे. शोभा ह्या त्यांचा मुलगा महेंद्र याच्या सोबत शनिवारी रात्रीच्या सुमाराला घरात झोपल्या होत्या. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून त्या वाटे आत प्रवेश केला. त्यानंतर त्याने बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून सुमारे १४ लाखांची रोकड व एक लाखांचे सोन्याचे दागिने त्यामध्ये ४ अंगठ्या, तीन तोळ्याचे मंगळसूत्र, पाच तोळ्याचे गंठण असा एकूण पंधरा लाख किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या चोरीचा गुन्हा निजामपूर पोलीस ठाण्यात दाखल केला असून गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे करीत आहेत.