ठाणे : उल्हासनगर शहरात नवरदेवाच्या गाडी समोर नाचणाऱ्या वऱ्हाडीला नवरदेवाच्या गाडीची जोरदार धडक दिल्याने ११ वऱ्हाडी जखमी झाले. यामध्ये एक जण गंभीर असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना उल्हासनगर मधील प्रवीण इंटरनॅशनल हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली आहे. याप्रकरणी हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नवरदेवाची गाडी चालविणाऱ्या चालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. विशाल सुरेश लुधवानी ( वय ३१) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. तो व्यसायाने इंटीरियर डिझानियर असल्याचे समोर आले आहे.
नाचणाऱ्या वऱ्हाडीला धडक: रोहित धरमपाल रिझवाणी यांचा ८ मे रोजी हॉटेल प्रवीण इंटरनॅशनलमध्ये विवाह सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी शेकडो वऱ्हाडी मंडळी दुपारच्या सुमारास जमली होती. त्यानंतर दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास नवरदेवाची वरात निघाली असता, या वरातीत महिला व पुरुषासह लहान मुले बॅण्डबाजाच्या तालावर नाचत होती. त्याच सुमारास नवरदेवाच्या महिंद्रा थार क्रमांक एमएस-५- इके - ९५९४ या सजविलेल्या गाडीतुन हॉटेलच्या पार्किंगमधून वरात निघताच, गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, गाडी नाचत असलेल्या वऱ्हाडीना एकामागून एकांना धडक देत गेली.