महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आवश्यक सेवेची दुकाने वगळता टाळेबंदीला ठाणे जिल्ह्यात 100% प्रतिसाद - Thane latest news

लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या हद्दीत रूटमार्च काढून मिनी टाळेबंदीबाबत नागरिकांना माहिती देऊन नागरिक व व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

ठाणे लॉकडाऊन
ठाणे लॉकडाऊन

By

Published : Apr 10, 2021, 7:20 PM IST

ठाणे - जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा विरोध असतानाही बहुतांश शहरात मिनी ठाणे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळून सर्वत्र शुकशुकाट होता. मात्र काही ठिकाणी नाकाबंदी वेळी दुचाकीस्वार, रिक्षाचालक व पोलिसात नियमाचे उल्लंघनावरून तू तू मै मै झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. तर दुसरीकडे जिल्ह्यात सर्वत्र सफाई कामगार, गॅस वितरणाची कामे तसेच अत्यावश्यक सेवेची कामे नेहमीप्रमाणे सुरू होती.

विविध शहरातील मुख्य बाजरपेठेत शांतता

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या शहरातील मुख्य बाजारपेठेत शेकडो नागरिक खरेदी करण्यासाठी येतात. यामुळे येथील व्यापाऱ्यांनी टाळेबंदीला विरोध केला. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या हद्दीत रूटमार्च काढून मिनी टाळेबंदीबाबत नागरिकांना माहिती देऊन नागरिक व व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

पोलीस रस्त्यावर, महापालिका कर्मचारी बेपत्ता

मिनी टाळेबंदी यशस्वी होण्यासाठी भर रखरखत्या उन्हात पोलीस रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत होते. मात्र त्यांच्या सोबतीला नेहमी असलेले महापालिका कर्मचारी, प्रभाग अधिकारी आज गायब झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यामुळे महापालिका प्रशासनाने याबाबत दखल घेण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

मिनी टाळेबंदीमध्ये रस्त्यावर जंतूनाशक फवारणी

शनिवार रविवारच्या विक-एंड टाळेबंदीमुळे रस्त्यावर शुकशुकाट असल्याने त्याचा फायदा घेत अग्निशामक दलाच्या जवानांना कल्याण शहरातील प्रमुख रस्त्यावर जंतुनाशक फवारणी केली आहे. तर कल्याणसह बहुतांशी रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा स्टॅण्डवर रिक्षा नसल्याने संपूर्ण रिक्षा स्टँड रिकामे होते. तर बाजारपेठेत देखील सर्व दुकाने बंद असल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला.

पोलिसांच्या चोख बंदोबस्तात वाहनांची तपासणी

कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बैल बाजार, स्टेशन परिसर , गांधारी ब्रिज आदी ठिकाणी स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात करून वाहनाची तपासणी केली. पोलिसांनी तपासणीवेळी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या आणि नियम मोडणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये कलम 207प्रमाणे 18 वाहने जप्त करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर कलम 179 प्रमाणे 59 वाहनावर कारवाई करत प्रत्येक वाहनधारकांकडून पाचशे रुपयांचा दंड आकारल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फैलाव कल्याण-डोंबिवलीत

ठाणे जिल्ह्यातील सर्व अधिक कोरोनाबाधित रुग्ण कालच्या दिवसात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आले आहेत. या महापालिका हद्दीत शुक्रवारी तब्बल २ हजार १९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिका हद्दीत 1 हजार 825 , नवी मुंबई महापालिकेत 1 हजार 33, मीरा भाईंदर महापालिकाहद्दीत 397, उल्हासनगर महापालिका हद्दीत 255, तर भिवंडी महापालिका हद्दीत 95 रुग्ण कालच्या दिवसात आढळून आले आहे. तसेच बदलापूर नगरपरिषद हद्दीत 190 आणि अंबरनाथ नगरपरिषद हद्दीत 222 रुग्ण आढळून आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details