मीरा भाईंदर (ठाणे) -महानगरपालिका क्षेत्रातील काही विकासकांकडे मोकळ्या जागेच्या थकीत कराची सुमारे १०० कोटी रुपये थकबाकी आहे. यामुळे याठिकाणी बांधकामासाठी परवानगी मंजुरी देऊ नये, तसेच थकबाकी वसुलीकरिता या विकासकांच्या मालमत्तावर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याकडे केली आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मनपामार्फत बांधकाम परवाना प्राप्त केला जातो. मात्र, सुधारित बांधकाम परवाना पत्र प्राप्त झाल्यानंतरही विकासक त्यात लक्षणीय अतिरिक्त बेकायदेशीर बांधकाम करत आहेत. तसेच मीरा भाईंदर महानगरपालिका नगररचना विभागामार्फत अनधिकृत बांधकाम विरोधी पथकास माहिती दिली जात नाही, असे पत्रात म्हणाले. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता बेकायदेशीर बांधकामे सर्रासपणे उभी राहत असताना या बांधकामकडे नगररचना विभाग आणि अनधिकृत बांधकाम विभाग डोळेझाक करत आहे.