ठाणे - दुचाकी लंपास करण्यात माहीर असलेल्या दुकलीवर झडप घालण्यात मध्यवर्ती पोलिसांना यश आले आहे. या दुकलीकडून मध्यवर्ती पोलिसांनी १० विविध कंपनीच्या दुचाकी आतापर्यंत हस्तगत केल्या आहे. तर या चोरट्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे. महादू आढारी (वय, ३२) धीरज शिंदे (वय २८, दोघेही (रा. गऊबाई पाडा, उल्हासनगर) असे अटक केलेल्या दुकलीचे नाव आहे.
दुचाकीचोरट्यांचा शहरात धुमाकूळ
अनलॉक काळापासून बाइक चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला असून दरदिवशी शहरातील विविध पोलीस ठाण्यात ३ ते ५ दुचाकीचोरीच्या घटनांची नोंद होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे उल्हासनगर पोलीस परिमंडळचे पोलीस उप-आयुक्त प्रषांत मोहिते यांनी विविध पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा, असे निर्देश दिले. त्यातच मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी महिन्यात एक दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास एपीआय खातीब करीत असतानाच चोरीला गेलेली हीच दुचाकी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळताच एपीआय खातीब पोलीस पथकासह जुन्नर येथे जाऊन ती दुचाकी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दुचाकी लंपास करण्यात माहीर असलेल्या आरोपी महादूचे नाव पुढे आले.