पंढरपूर (सोलापूर)- केंद्रातील मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकरी, व्यापाऱ्यांवर लादला. तो अन्यायकारक निर्णय तत्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने पंढरपूर येथील स्टेशन रोडवर आंदोलन करण्यात आले.
पंढरपुरात पंतप्रधानांच्या प्रतिमेला कांद्याचा हार घालत युवक काँग्रेसचे आंदोलन
कांदा निर्यातबंदी निर्णय मागे घेण्यासाठी पंढरपुरात युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन नागने यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला कांद्याचा हार घालून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांदा निर्यातबंदी करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, कांदा निर्यातबंदी निर्णय रद्द करा, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
काँग्रेस पंढरपूर शहर अध्यक्ष अॅड. राजेश भादुले यांच्यावतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस आय सेवादलचे पंढरपूर शहर अध्यक्ष गणेश पांडुरंग माने, बडवे, सुहास भाळवणकर, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष समीर कोळी, ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष मधुकर फलटणकर, काकासाहेब बुराडे, उपाध्यक्ष महेश माने, मंदार कांबळे हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.