पंढरपूर- माढा तालुक्यातील भोसरे येथील तरुणाने भीतीपोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विकास ओहोळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सांगोला येथील रणजित शिर्के याच्याविरुद्ध कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकासला फोनवरून दिली धमकी..
कुर्डूवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील विकास ओहोळे याची इस्टाग्रामवर पुणे येथील मुलीशी मैत्री झाली होती. विकास त्या मैत्रिणीसोबत चॅटिंग करत असत. विकासप्रमाणे त्या मुलीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रणजीत शिर्के हा मित्र होता. रणजीत शिर्के यास विकास ओहोळ हादेखील मैत्रिणीबरोबर बोलत असल्याचे समजून आले. मात्र, विकासने त्या मुलीशी चॅटिंग केल्याचे रणजीतला पटत नव्हते. यावरून रणजीतने विकासचा नंबर मिळवून विकासला कॉल करून 'तू माझ्या मैत्रिणींशी चॅटिंग करतो, त्या मैत्रिणीला अश्लील मेसेज व त्रास देतो म्हणून, तुझ्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यामध्ये अशी तक्रार देतो. विकासाला भीती दाखविण्यासाठी धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या विकासने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
कुर्डूवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
रणजित शिर्के याने धमकी दिल्यामुळे विकासने आत्महत्या केल्याची तक्रार भाऊ आकाश ओहोळ यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली. रणजित शिर्केच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगोला येथून रणजित शिर्केला पोलिसांनी अटक केली आहे.