सोलापूर -चित्रांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी 50 टक्के रक्कम ही सामाजिक कामासाठी देण्याचा निर्णय युवा चित्रकार सचिन खरात यांनी घेतला आहे. 25 डिसेंबरला चेन्नई येथे सचिन यांच्या चित्रांचा लिलाव होणार आहे. या लिलावात त्यांची निवडक अशी 6 चित्रे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. या चित्रांच्या विक्रीतून जमा झालेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी देणार असल्याचे सचिन खरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
मोठ्या कष्टाने चित्रकलेत नाव कमवणारे सचिन आपल्या कलेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले आहेत. कधीकाळी सोलापुरातील थिएटरमध्ये ब्लॅक तिकीट विकणाऱ्या सचिन यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील चित्रकारांमध्ये नावलौकिक मिळविला आहे. या स्थानावर पोहोचताना समाजाचे विदारक चित्र सचिन यांनी अनुभवले आहे. त्यामुळे, आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून सचिन यांनी चेन्नई रोटरी क्लबतर्फे आयोजित चित्रांच्या लिलावात सहभाग घेतला आहे.