पंढरपूर (सोलापूर) -जिल्ह्यामध्ये धार्मिक पर्यटन परिपूर्ण संपन्न आहे. उजनी धरणाच्या पर्यटनाचा विषय अजूनही कागदावरच असल्याचे दिसतो. उजनी धरण नैसर्गिक विविधतेने नटलेले आहे. राज्यातील इतर धरणांच्या तुलनेत उजनी धरणाचा पर्यटन विकास हा जलपर्यटन आणि कृषी पर्यटन या दृष्टीनेही मागास आहे. तसेच धरण पाण्याने पूर्ण भरल्यानंतर तर राज्याच्या वेगवेगळ्या भागातून लोक येथे येतात. याचा पर्यटनवाढीसाठी उपयोग करून घेण्याची गरज असल्याचे मत उजनी अभ्यासक अरविंद कुंभार यांनी व्यक्त केले आहे.
उजनी पर्यटन विकासासाठी शासनाकडून हालचाली -
40 वर्षाखालील सोलापुरातील दुष्काळी जनतेचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी उजनी धरणाची निर्मिती केली. पुणे सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेली उजनी पर्यटनदृष्ट्या अधिकच महत्त्वाची ठरली आहे. धरणामुळे तीन जिल्ह्यातील 2 लाख 49 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली आले आहे. दळणवळणाच्या या सोयीसोबतच परिसरातील अनेक गोष्टी पर्यटनवाढीला मदत करणाऱ्या आहेत. उजनी धरण जलाशयाचा निसर्गरम्य परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्यात येत असून ४३ हेक्टर क्षेत्रावर पर्यटन केंद्र उभा करण्याच्या गतिमान हालचाली सुरू आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही उजनीच्या पर्यटनासाठी योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात उजनी जलाशय पर्यटन केंद्र म्हणून देखील वरदान ठरू शकते.