पंढरपूर (सोलापूर) :राज्य पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांची व्यक्तिगत पातळीवर धाडसीची उदाहरणे असंख्य आहेत. सांगली जिल्ह्यातील आटपाडी सारख्या दुष्काळी तालुक्यातून आलेल्या राजश्री पाटील यांचा सामान्य तरुणी ते मंगळवेढा विभागाच्या पहिल्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणूनचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे. कन्या दिनानिमित्ताने (26 सप्टेंबर) विशेष असा त्यांचा प्रवास युवतींसाठी ऊर्जास्रोत ठरत आहेत.
भविष्याच्या वाटचालीसाठी सधन कुटुंबातून मिळणारी ऊर्जा
भोसले कुटुंबामध्ये आधुनिक शिक्षणाची फार मोठी परंपरा लाभल्याचे दिसून येते. राजश्री पाटील यांचे वडिल संभाजीराव पाटील हे रसायन शास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. त्यामुळे मुलींना त्यांनी मुलांच्या बरोबरीने शिक्षण दिले. मुलींना योग्य दिशा देण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन देण्याचे काम पाटील कुटुंबीयांनी केले. याच प्रेरणेतून राजश्री पाटील यांनी आपले शालेय शिक्षण कन्या शाळेतूनच पूर्ण केले. या शाळेतून शालेय जीवनातूनच आपल्या पैलूंना ओळखण्याची संधी मिळाली. पुढे त्यांच्या पैलूंना आकार देण्याचे काम माध्यमिक शिक्षण व महाविद्यालयीन जीवनामध्ये घडण्यात मदत झाली. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात टेलिकम्युनिकेशन या शाखेतून अभियांत्रिकी शाखेची पदवी संपादन केली.
स्पर्धा परीक्षेतील साध्या व सोप्या पद्धतीच्या अभ्यासामुळे घवघवीत यश
राजश्री पाटील यांनी टेलिकम्युनिकेशन शाखेतून अभियांत्रिकी पदवी घेतली. त्यानंतर खासगी क्षेत्रामध्ये मोठ्या पगाराची नोकरी सोडून राजश्री पाटील यांनी शासकीय सेवेमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना त्यांनी वेळेचे काटेकोर पालन करणे, साध्या व सोप्या पद्धतीचा अभ्यास करण्यावर भर दिला. पहिल्याच प्रयत्नात त्यांना नायब तहसीलदार या पदाची संधीही मिळाली. मात्र पोलीस दलात जाण्याची आवड असल्यामुळे 2019 सालच्या स्पर्धा परीक्षेत उपअधीक्षक पोलीस पदासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर नाशिक येथील पोलीस अॅकॅडमीमध्ये खडतर वाटणारे प्रशिक्षणही त्यांनी पूर्ण केले.