सोलापूर -आज देशातील प्रमुख मध्यवर्ती कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने शासकीय, निमशासकीय, संघटीत, असंघटीत, खाजगी क्षेत्रातील कामगारांच्यां विविध न्याय मागण्यांसाठी तसेच प्रलंबित प्रश्न आणि कामगार कायद्यातील प्रतिगामी बदलाच्या विरोधात सार्वत्रिक देशव्यापी संपाची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने सोलापुरात ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे राज्य महासचिव कॉ. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला होता.
दत्त नगर, लाल बावटा कार्यालय येथून १५ हजार कामगारांचा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आंध्रदत्त चौक, पद्मशाली चौक, जिंदाशहा मदार चौक, किडवाई चौक, बेगमपेठ पोलीस चौकी, जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट या मार्गावर निघाला. मोर्चाला परवानगी नसताना देखील हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे शेकडो पोलिसांचा फौजफाटा यावेळी उपस्थित होता. पोलिसांच्या दडपशाहीला तोंड देत मोर्चेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. हजारोंच्या संख्येने रस्त्यावर मोर्चेकरी उपस्थित होते.
देशातून 'कामगार' ही संकल्पनाच नष्ट करण्याचा कुटील डाव -
यावेळी माजी आमदार नरसय्या आडम यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारने कामगार विरोधी प्रतिगामी बदल करून पुन्हा एकदा देशामध्ये गुलामगिरीची नांदी आणू पाहत आहे. कारण या देशातून कामगार ही संकल्पनाच नष्ट करण्याचा कुटील डाव सरकारने रचलेला आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशातील २ कोटी कामगार, कर्मचारी स्वतःची रोजीरोटी गमावून बसले आहेत. बेरोजगारांच्या हाताला सरकार काम देत नाही. तसेच खाजगी व कॉर्पोरेट कंपन्यांनी मनमानी करून कोट्यावधी कामगारांना रस्त्यावर फेकले. कामगार कायद्यांना नख लावून सरकार काय साध्य करणार असा सवाल आडम यांनी केले. तसेच कामगार-कर्मचारी विरोधी असणाऱ्या काळ्या कायद्याची कदापिही अमलबजावणी होऊ देणार नाही. जे कायदे रक्त सांडून मिळविलेले आहेत. ते अबाधित राखण्यासाठी पुन्हा रक्त सांडण्याची कामगारांची तयारी आहे, अशी आगपाखडही त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर केली.