पंढरपूर - नगरपरिषद कर्मचार्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून पगार न झाल्याने 29 डिसेंबर रोजी नगरपरिषदेसमोर कामगार संघटनेकडून बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते. तर 4 जानेवारीपर्यंत अनुदान जमा न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. प्रशासनाकडून अनुदान जमा न केल्यामुळे नगरपरिषदेत समोर कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, राज्याचे सरचिटणीस सुनील वाळूजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, कार्याध्यक्ष शरद वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे.
दोन महिन्याचे वेतन थकीत
महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदांना कर्मचार्यांचे वेतन वेळेवर व्हावे, या हेतूने शासनाने कर्मचार्यांच्या वेतनासाठी सहायक वेतन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सर्व शासकीय कर्मचार्यांप्रमाणेच नगरपरिषदेच्या सर्व कर्मचार्यांचे वेतन होणे आवश्यक आहे. परंतु शासनाकडून वेतनासाठी मिळणारी सहायक अनुदानाची रक्कम वेळेवर न मिळाल्याने नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे कर्मचार्यांचे पगार झालेले नाहीत. कोरोनाच्या काळात हेच सर्व नगरपरिषद कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून गेल्या मार्च महिन्यापासून काम करीत आहेत. परंतु, शासनाकडून गेल्या दोन वर्षांपासून सहायक वेतन अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेनंतर दिली जाते.
अनुदान जमा करण्याची मागणी
नगर परिषदेच्या कर्मचार्यांचे पगार हे 23 व 24 तारखेला होतो. परंतु शासनाकडून अद्यापपर्यंत सहायक वेतन अनुदानाची रक्कम पंढरपूर नगरपरिषदेला दिली गेली नाही. त्यामुळे पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून वेतनापासून वंचित राहिला आहे. त्यांना अनुदान मिळत नसल्याने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे. 4 जानेवारीला नगरपरिषद कर्मचारी शिष्टमंडळाकडून काम बंद आंदोलनाचे निवेदन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगराध्यक्षा साधना भोसले यांना संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, सरचिटणीस सुनील वाळूजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, कार्याध्यक्ष शरद वाघमारे, नागन्नाथ तोडकर, उपाध्यक्ष जयंत पवार, अनिल गोयल यांच्या शिष्टमंडळाने दिले.