पंढरपूर (सोलापूर) -सावळा विठ्ठल हा गोरगरीबांचा देव म्हणून ओळखला जातो. टाळेबंदीच्या काळामध्ये विठुराया हा आठ महिने कूलुपामध्ये बंद होता. दसऱ्याच्या मुहूर्तावर विठुरायाचे मुखदर्शन सुरू झाले. मात्र, पांडुरंगाची मनोभावे दर्शन घेण्याची इच्छा असूनही भाविकांना दर्शन घेता येत नव्हते. त्याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक माय माऊली एसटी बसवर रंगवलेल्या विठुरायाचे दर्शन घेण्याचा फोटो व्हायरल झाला होता. 'त्या' महिलेला सोमवारी योगायोगाने विठुरायाचे प्रत्यक्ष मुखदर्शन घडून आले. ही माय-माऊली मोहोळ तालुक्यातील राम हिंगणी या गावची आहे. सईबाई प्रकाश बंडगर असे या माऊलीचे नाव आहे.
असा झाला हा व्हिडिओ व्हायरल..
गेल्या वर्षीपासून विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून विठाई एसटी बससेवा चालू करण्यात आली. वारकरी संप्रदायाचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने विठाई एसटी बसची निर्मिती केली होती. विठाई बस ही राज्याच्या कानाकोपऱ्यातील बस स्थानकांतून विठुरायाच्या नगरीसाठी सोडली जाते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक बसस्थानकामध्ये विठाई बस तेव्हा पाहायला मिळत होती. गेल्या काही दिवसांमध्ये मोहोळ बस स्थानकावर एक 60 वर्षीय महिला विठाई एसटीवरील पांडुरंगाच्या चित्रावर डोके टेकून मनोभावे नतमस्तक होतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याप्रसंगी तेथे उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीने हा माय माऊलीचा भाव आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये टिपला. त्यानंतर श्रद्धेला मोल नसते, या ओळींखाली हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
रामकृष्ण महाराज वीर यांच्या माध्यमातून दर्शनाचा योग..