माढा -(सोलापूर)- कर्जबाजारीपणाला कंटाळून हताश झालेल्या एका शेतकरी कुटुंबातील महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माढा तालुक्यातील मानेगावात सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे. राजश्री शेळके असे त्या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी पत्नीचे नाव आहे. त्यांच्यावर सध्या बार्शी येथील जगदाळे रुग्णालयात उपाचार सुरू आहेत.
याबाबतची कुटुंबीयांकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, मानेगाव येथील द्राक्ष बागायत दार शेतकरी अशोक शेळके यांची दोन एकर द्राक्ष बाग आहे. बाग जोपसण्यासाठी त्यांनी कर्ज काढले होते. मात्र गेल्या १५ दिवसात झालेल्या अतिवृष्टीने द्राक्ष बागेसह इतर पिकाचेंही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड करायची कशी या विंवचनेते शेळके कुटुंबीय होते.
कर्जाच्या विवंचनेतून शेतकरी पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
गेल्या १५ दिवसात माढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आणि कर्जाचा डोंगर असल्याच्या विवंचनेतून एका शेतकरी पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अतिवृष्टीने शेतकरी मोठ्या प्रमाणात हतबल झाल्याचे दिसून येत आहे,
दरम्यान, राजश्री शेळके या सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास शेतीमधील द्राक्ष बागेत गेल्या होत्या. द्राक्षबागेची नापिकी आणी कर्ज या विवंचनेत असणाऱ्या राजश्री यांनी बागेवर फवारणी करण्याचे कराटे नावाचे विषारी औषध पिले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. औषध पिल्याने त्या बागेतच बेशुद्ध होऊन पडल्या. या घटनेची माहिती मिळताच त्यांचे पती आणि परिसरातील शेतकऱ्यांनी मिळून राजश्री यांना तत्काळ बार्शीला उपचारासाठी हलवले.
अशोक शेळके यांच्यावर एका राष्ट्रीयकृत बँकेचे आणि खासगी सावकाराचे कर्ज आहे. व्याजामुळे वाढत चाललेला कर्जाचा डोंगर आणि त्यातच परतीच्या झालेल्या पावसाने दोन एकरवरील द्राक्ष बागेचे झालेले अतोनात नुकसान शेळके कुटुंब तणावात होते. पिकाच्या नुकसानीच्या नैराश्यातूनच राजश्री शेळके यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.