महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात वाळू माफियांवर महिला अधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई

टेंभुर्णीच्या मंडलाधिकारी मनिषा लकडे आणि रांझणीच्या मंडलाधिकारी शबाना कोरबू यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध वाळु वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. विशेष म्हणजे चालक पसार झाल्याने मनिषा लकडे यांनी वाहन सात कि.मी. स्वतः चालवत आणून टेंभुर्णी पोलीसांच्या ताब्यात दिले.

tembhurni
महिला अधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई

By

Published : Dec 20, 2019, 8:17 AM IST

सोलापूर - माढा तालुक्यात वाळू माफियांचा सर्वाधिक धुमाकूळ हा कोंढार भागात होतो. तहसील व पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई होऊनही वाळू वाहतूक सुरुच असते. अशा स्थितीत दोन महिला मंडलाधिकाऱ्यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे वाळु माफियांचे धाबे दणाणले आहे. माढा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

टेंभुर्णीच्या मंडलाधिकारी मनिषा लकडे यांनी दोन वाहनांवर तर रांझणीच्या मंडलाधिकारी शबाना कोरबू यांनी एका वाहनावर कारवाई करत पाच लाख अकरा हजांराचा दंड ठोठावून वाहने जप्त केली. विशेष म्हणजे चालक पसार झाल्याने मनिषा लकडे यांनी वाहन सात कि. मी. स्वतः चालवत आणून टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

मनिषा लकडे या शुक्रवारी संध्याकाळी ७.३०च्या दरम्यान कोतवाल दिपक काळे या महसूल कर्मचाऱ्यासह जात असताना त्यांना टेंभुर्णीतील खडके वस्ती रस्त्याने अवैध वाळू घेऊन जाणारे वाहन निर्दशनास आले. त्यांनी तातडीने या वाहनाचा पाठलाग करुन ते थांबवले. या वाहनाचा चालक मात्र पसार झाला. यानंतर लकडे यांनी टेंभुर्णी पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र, वाहन पोलीस ठाण्यात नेण्यासाठी चालक नसल्याने अखेर तेथून रात्री स्वतः मंडलाधिकारी मनीषा लकडे यांनी वाहनावर कारवाई करत स्वतः ते वाहन चालवत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आणून सोडले. तसेच दुसऱ्या दिवशीही सकाळी ११.३०च्या दरम्यान मंडलाधिकारी लकडे यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील संकेत मंगल कार्यालयासमोरून विना परवाना वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत ते टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबरोबरच रांझणीच्या मंडलाधिकारी शबाना कोरबू यांनीही शुक्रवारी टेंभुर्णी परिसरातून विना परवाना उपसा केलेली वाळु वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. या तीनही कारवायांमध्ये तलाठी संदीप तांबवे, कोतवाल दिपक काळे यांचे त्यांना सहकार्य लाभले. वाळु माफियांवर वेळीच कारवाई केल्याने मंडलाधिकारी लकडे व कोरबू यांचे कौतूक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details