विजय कबाडे पोलीस उपायुक्त यांची प्रतिक्रिया सोलापूर : सोलापूर पुणे महामार्गावर एक विचित्र दुर्घटना घडली आहे. शहराजवळील पुलावर डंपर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी तीन वाहने डंपरवर आदळली आहेत. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, शिंदे गटाचे माजी नगरसेवक अमोल शिंदे यांनीही नंतर नागरिकांच्या बाजूने महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मृतदेह रस्त्यासमोर ठेवून नागरिकांनी ठिय्या दिल्याने पोलिसांची चांगली तारांबळ उडाली होती.
अपघातामुळे नागरिक संतप्त :फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिड, पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी नागरिक, शिवसेना पदाधिकाऱ्यांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली. या अपघातात सुप्रिया गणेश नरखेडकर (वय 35 रा. अनगर, ता. मोहोळ, जि सोलापूर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, त्यांच्या सोबत दुचाकीवर असलेले गणेश नरखेडकर हे जबर जखमी झाले आहेत. महामार्गावर झालेल्या अपघातामुळे नागरिक संतप्त झाले आहे. पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी अपघातस्थळी धाव घेत नागरिकांना समज देऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी पोलिसांनी शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवला आहे.
डंपर अचानकपणे थांबल्याने विचित्र अपघात :सोलापूर शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, सोलापूर पुणे महामार्गावर सोलापूर शहराजवळ बाळे पुलावर शुक्रवारी दुपारी अचानकपणे डंपरचालकाने ब्रेक मारून थांबविला. त्यामुळे मागून येणारी स्विफ्ट डिझायर गाडी जोरात डंपरला धडकली. यात स्विफ्टमध्ये बसलेला चालक जखमी झाला. तसचे स्विफ्ट कारमागे असलेल्या दुचाकी स्वाराने कारला धडक दिली. यात दुचाकीवरील सुप्रिया नरखेडकर या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी धारक गणेश नरखेडकर गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे सोलापूर सोलापूर पुणे महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
शिवसेना जिल्हाध्यक्षांचा भर रस्त्यात राडा :शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष, सोलापूर महापालिकेचे माजी नगरसेवक अमोल बापू शिंदे यांनीही तातडीने अपघातस्थळी धाव घेतली. डंपर चालकावर हत्येचा गुन्हा दाखल करावा, तसेच त्याला अचानक ब्रेक लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत त्यांनी नागरिकांची बाजू घेतली. यावरुन जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांचा पोलिसांशी वाद झाला. पोलिसांनी बॅरिकेड लावल्याने डंपर चालकाने अचानक डंपर थांबवल्याचा आरोप नागरिक करत होते पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी हा आरोप फेटाळून लावत पोलिसांच्या चुकीमुळे हा अपघात झाला नसल्याचे म्हटले आहे. त्यांतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली.