पंढरपूर (सोलापूर) -सांगोला येथे विजेच्या धक्का लागून एका वायरमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अहिल्यानगर येथे खांबावर चढून विजेचे काम करीत असताना कंत्राटी कामगार शुभम शितोळे यास विजेचा जबर धक्का बसून तो खांबावर ठार झाला. ही घटना समोर येताच गावात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात नेमका कसा घडला, याबाबतची माहिती अद्यापसमोर आली नाही. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत.
अचानक वीज प्रवाह चालू झाला -
अहिल्यानगर येथे शुभम शितोळे हे खांबावर चढून विजेचे काम करीत असताना अचानक प्रवाह चालू होऊन स्पार्क तयार झाला होता. या स्पार्कमुळे शुभम यास विजेचा जबर धक्काबसून ते खांबावरच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते.
जेसीबीच्या साहाय्याने मृतदेह खाली उतरवला -
विजेचा झटका बसल्यानंतर वायरमन शितोळे यांचा मृतदेह विजेच्या खांबावरच लटकून राहिला होता. यानंतर गावातील काही नागरिकांनी जेसीबीच्या साहाय्याने हा मृतदेह खाली उतरवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शुभमच्या घरी आई-वडील व बहीण असा परिवार आहे. शुभम हा घरचा कर्ता पुरुष असल्यामुळे त्याच्यावर घराची जबाबदारी होती.