पंढरपूर (सोलापूर) -करमाळा तालुक्यातील खडकी येथे चारित्र्याच्या संशयावरुन राहत्या घरामध्ये डोक्यात दगडी पाटा घालून पत्नीने पतीला ठार केल्याची धक्कादायक ( wife murdered her husband ) घटना घडली आहे. पत्नी सुनिता गायकवाड हिने रागाच्या भरात पती सुदामराव शामराव गायकवाड (वय 52 रा. खडकी ता. करमाळा) डोक्यात दगडी पाटा घालून खून केला आहे. पत्नी सुनीता सुदामराव गायकवाड अटक करण्यात आली आहे.
'सुदाम रक्ताच्या थारोळ्यात पडला'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदाम गायकवाड हे आपल्या कुटुंबासह खडकी येथे राहतात. सुदाम गायकवाड यांना तीन मुले आहेत. तिन्ही मुले मजुरी करण्यासाठी बाहेरगावी आहेत. सुनिता ही पती सुदाम याच्यावर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होती. यातूनच रविवारी सकाळी सुनिता हिने पती सुदाम याच्या डोक्यात दगडी पाटा घातला होता. शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना हा प्रकार समजला. त्यानंतर सुदाम रक्ताच्या थारोळ्यात पडला. तोंडावर गंभीर दुखापत झालेली दिसली. त्याला रुग्णवाहिकेतून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले.