महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिबट्याला गोळ्या घालण्याची परवानगी डॉ. धवलसिंह मोहिते पाटलांना कोणी दिली?, अनेक प्रश्न गुलदस्तात

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना बिबट्याला मारण्यासाठी अधिकृतपणे परवानगी कोणी दिली? कधी दिली? धवलसिंहाचे नाव शार्प शूटरच्या यादीत जाहीरपणे का सांगितले नाही? असे अनेक प्रश्न गुलदस्त्यातच आहेत.

Who gave permission to dr Dhawal Singh Mohite Patil for shot the leopard
बिबट्याला गोळ्या घालण्याची परवानगी डॉ. धवलसिंह मोहिते पाटलांना कोणी दिली?, अनेक प्रश्न गुलदस्तात

By

Published : Dec 20, 2020, 2:25 AM IST

सोलापूर- जिल्ह्यात दहशत निर्माण केलेल्या नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी पोलीस खात्याच्या शार्प शूटरसह वन खात्याच्या अधिकाऱ्यांना अखेर यश आले. 120 कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून त्या बिबट्याचा शोध लावला. तेव्हा अचानकपणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आले आणि त्यांनी बिबट्यावर तीन गोळ्या झाडत स्वतःचे नाव करून घेतलं. यामुळे 120 कर्मचाऱ्यांचे मात्र मनोबल खचले आहे. पंरतु डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना बिबट्याला मारण्यासाठी अधिकृतपणे परवानगी कोणी दिली? कधी दिली? धवलसिंहाचे नाव शार्प शूटरच्या यादीत जाहीरपणे का सांगितले नाही? असे अनेक प्रश्न अजूनसुद्धा गुलदस्त्यातच आहेत.

हे वैयक्तिक कार्य नाही. यामागे मोठ्या टीमचे कार्य -
शुक्रवारी सायंकाळी बिटरगाव वांगी क्रमांक 4 येथील राखुडे वस्तीवरील केळीच्या बागेत नरभक्षक बिबट्याचा खात्मा करण्यात आला. या बिबट्याचा शोध गेल्या सतरा दिवसांपासून वन खात्याचे कर्मचारी आणि अधिकारी घेत होते. शुक्रवारी दुपारी डॉग स्क्वाडने बिबट्याचा शोध घेतला होता. त्याला ट्रॅप लावून पकडणार होते. पण शार्प शूटर आले आणि गोळ्या घालून ठार केले. त्याला पकडता आले असते, पण अचानकपणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आले आणि त्यांनी तीन गोळ्या झाडत बिबट्याचा खात्मा केला. हे कार्य त्याचे वैयक्तिक नाही तर यामागे वन खात्याची मोठी टीम देखील कार्यरत आहे.

शार्प शूटरच्या नियुक्तीमध्ये गौडबंगाल -
वन खात्याला 6 डिसेंबर 2020 आदेश मिळाला की, नरभक्षक बिबट्यास ठार करा. यासाठी जुनेद मर्चंट, हर्षवर्धन तावरे आणि महाडिक या खाजगी शार्प शूटरची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच शहर पोलीस दलातील नेमबाज 10 पोलीस कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले होते. कुठेच डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे नाव यापूर्वी जाहीर झाले नव्हते. उपवनसंरक्षक अधिकारी म्हणतात की, त्यांना अधिकृत रित्या परवानगी देण्यात आली होती. तर हर्षवर्धन तावरे म्हणतात की, मी माझा सहायक म्हणून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना नियुक्त केले होते. आता यामध्ये खरे कुणाचे समजायचे? हा प्रश्न आहे. यामध्ये मोठे गौडबंगाल लपलेल्याची चर्चा आहे.

माहिती देताना वनविभाग अधिकारी...
नरभक्षक बिबट्यावर सोलापूर शहरात झाले अंतिम संस्कार -बिबट्याच्या मस्तकात, पाठीवर आणि मानेवर अशा तीन गोळ्या मारण्यात आल्या. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्रीच त्याला सोलापूर शहरातील सिद्धेश्वर वन विहारात आणले आणि त्यावर शनिवारी सकाळी पोस्टमार्टेम करून अंतिम संस्कार करण्यात आले.

तीन जिल्ह्यात बिबट्याचे 11 हल्ले 9 मृत्यू आणि 4 जखमी
या नरभक्षक बिबट्याने तीन जिल्ह्यात एकूण 11 हल्ले केले. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता. सोलापूर जिल्ह्यातील 3 जणांना बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमावले होते. सोलापूरमधील कल्याण देविदास फुंडे (वय 40 वर्ष रा. लिंबेवाडी, ता. करमाळा), जयश्री दयानंद शिंदे (वय 25 रा. अंजनडोह, ता. करमाळा) तर ऊसतोड कामगाराची मुलगी फुलाबाई हरिश्चंद्र कोटले (वय 9 वर्ष) यावर चिकलठाणा (ता करमाळा) हल्ला झाला होता. या तिघांचा मृत्यू झाला होता.

करमाळा परिसरात आणखीन बिबटे आहेत -
उपवनसंरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील यांनी अधिकृतपणे माहिती देताना सांगितले की, करमाळा परिसरात आणखीन बिबटे आहेत. पंरतु ते नरभक्षक नाहीत, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी वन खात्याची टीम सदैव करमाळा भागात कार्यरत असणार आहे. उजनी धरणाचा मागील भाग हा मुबलक पाणी असल्याने या ठिकाणी घनदाट शेती आहे. म्हणून या भागात तरस, रान डुक्कर आणि बिबट्याचा वावर आहे.

हेलिकॉप्टर शेवटपर्यंत आलेच नाही -
बिबट्याला पकडण्यासाठी राजकारण देखील सुरू झाले होते. राज्यसरकारकडे हेलिकॉप्टर नसेल तर आम्ही देऊ, असे निंबाळकर म्हणाले होते. त्यावर पालकमंत्री दत्ता भरणे यांनी चिमटा घेत उत्तर दिले होते की, राज्य सरकार व वन खाते बिबट्याला पकडण्यासाठी सक्षम आहे. पण शेवटपर्यंत हेलिकॉप्टर काही आलेच नाही.

बिबट्याचा खात्मा केल्यानंतर त्याची शेपूट पकडून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी काढलेला फोटो.
बिबट्याला मारून त्याची शेपूट पकडून फोटो काढणाऱ्यांवर कारवाई होणार -
डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बिबट्याला ठार करून त्याची शेपूट पकडून फोटो काढत असल्याचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला होता. एका वन्यजीव प्राण्याला मारून असे फोटो सोशल मीडियावर वायरल केल्याप्रकरणी कारवाई करणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक अधिकारी धैर्यशील पाटील यांनी दिली.


ABOUT THE AUTHOR

...view details