सोलापूर- सध्या सगळीकडेच सोशल मीडियाची क्रेझ पाहायला मिळत आहे. पण, ही क्रेझ सध्या बाजारपेठांतही पोहोचली आहे. सोलापुरातील बाजारपेठेत सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडियातील प्रसिद्ध असलेल्या नावाने गव्हाचे ब्रँड सोलापुरातील बाजारात आले आहेत. या ब्रँडला मागणी देखील वाढली आहे.
व्हॉट्सअॅपसह ट्विटरच्या नावाने गव्हाचे 'ब्रँड'
सोशल मीडियाची वाढती क्रेझ लक्षात घेता आता गव्हाची विक्री करण्यासाठी चक्क सोशल मीडियातील प्रसिद्ध असलेल्या नावाचाच वापर करायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियातील नावाजलेले ब्रँड थेट स्वयंपाक घराच्या कट्ट्यावर ठाण मांडला आहे. सोशल मीडियाच्या नावाने विक्री होणाऱ्या गव्हाची विक्री सध्या सोलापूरातील बाजारात सुरू आहे.
सोलापूरमध्ये सध्या धान्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानात याचीच चर्चा रंगलीय. पूर्वी शरबती गहू, बन्सी गहू, राधिका गहू अशा गव्हाची अनेक नावे तुम्ही ऐकली असतील. फार तर एखाद्या छोट्या मुलीचे किंवा देव-देवतांचे नाव धान्याला दिले जायचे. मात्र या सर्व नावांना मागे टाकत सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गव्हाची पारंपरिक नावे बाजूला सारत सोशल मीडियात ब्रँड असलेल्या अॅपच्या नावाने गव्हाचे ब्रॅन्ड तयार झालेत. यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर, अशा विविध नावांचे गहू सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत.
सोशल मीडियाच्या नावाने ब्रँड केलेला हा गहू मध्यप्रदेशातील रतलाम या भागातून येत आहे. याला सोलापुरातच नाही तर कर्नाटकातही चांगली मागणी आहे. गेल्या वर्षभरापासून गुगल, व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटर या प्रवाहाबरोबर नावात बदल केलेल्या मध्य प्रदेशच्या कंपनीने ब्रँड विकसित केलेल्या गव्हाला महिला वर्गातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
काळानुरूप आता ब्रॅण्डची नावे देखील बदलली जात आहेत. मात्र, अशा पध्दतीची नावे देवून व्यापाऱ्यांना नक्की काय साध्य करायचे आहे हे कळत नाही. कारण ब्रॅण्ड बदलल्याने बोगस माल विक्रीची शक्यताही अधिक आहे.