सोलापूर- कोरोनापासून मानवजातीचं रक्षण व्हावं, या उदात्त भावनेनं सोलापुरातल्या गीतकार पुंडलिक दोमल यांनी कोरोनाकाव्य रचलं होतं. त्यांनी तेलगू भाषकांचं प्रबोधन करण्यासाठी अनेक लोकगीतं आणि कवितांची रचना केली आहे. मात्र या लोककवीचा कोरोनामुळंचं दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गीतकार पुंडलिक दोमल हे गिरणी कामगारही होते.
लोकप्रबोधनासाठी 'कोरोनाकाव्य' रचणाऱ्या लोककवीचा कोरोनामुळेच करुण अंत. . . कोरोनाची लागण झाल्यानं शहरात सर्वाधिक मृत्यू हे पूर्व भागातील तेलुगु भाषिक पट्ट्यात होताना दिसत होते. पुंडलिक दोमल यांना कोरोनाचे रौद्ररुप आणि दगवणारी माणसं यामुळे असह्य वेदना होत होत्या. शिवाय याच भागात अशिक्षित कष्टकरी वर्ग मोठा असल्याने आणि भाषिक वेगळेपणामुळं लोकांत कोरोनाचं गांभीर्य कमी होतं. म्हणून मग आपल्या परिसरातील कामगार वर्गाचं प्रबोधन व्हावं म्हणून दोमल हे तेलुगु लोकगीतं आणि काव्य रचना करत. त्या लोकांपर्यंत गेल्या एवढचं नाही, तर त्या तेलगू राज्य असलेल्या आंध्र प्रदेश आणि तेलंगाणात लोकप्रिय झाल्या.
गीतकार पुंडलिक दोमल यांची रचना 'कोरोना रोगम मर्मम तेललुचको रन्ना' अर्थात कोरोनाचे मर्म ओळखून त्याचे संक्रमण रोखू या, त्याच्याशी लढा देऊ या, अशा आशयाची ही रचना त्यांनी केली. दोमल स्वतः गायक असल्याने त्यांनी तेलुगु लोकगीतांच्या चालीवर गाऊन त्याचे रेकॉर्डिंग केले आणि सोशल मीडियावर ते गीत व्हायरल होताच हजारो लाइक्स, शेअर्स त्याला मिळत होते. लोक त्यांचं अभिनंदन करू लागले. त्यांना फोनवरुन त्यांचे आभार मानू लागले. असं असतानाच त्यांचे फोन घेणे बंद झाले, कारण ते आजारी पडले. किरकोळ ताप आणि निमोनियाची लक्षणे त्यांना आढळून आली. या उपचारानंतर ते बरे झाले ते तात्पुरते. पण पुन्हा ताप आला तेव्हा कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यांना उपचारासाठी यशोधरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण अवघ्या चार दिवसातच कोरोनाशी लढण्यासाठी प्रबोधनपर काव्य रचणाऱ्या या कलावंताचा कोरोनाने बळी घेतला.
गीतकार पुंडलिक दोमल यांनी गायलेले 'श्री मार्कंडेय चरित्र गान' संपूर्ण आंध्र, तेंलगणासह संपूर्ण भारतात लोकप्रिय आहेत. त्याच्या हजारो सीडी, डीव्हीडी प्रकाशित झाल्या आहेत. पण कोरोनाशी लढा देण्याची उर्जा देणारा कवी आज मात्र कोरोनसमोर हरला. त्यामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.