सोलापूर - विवाह सोहळा म्हटले, की आपल्या डोळ्यांसमोर, मोठा हॉल, वऱ्हाडी मंडळींचा डामडौल, डीजे, शुभमुहूर्त, तिथी, असे चित्र उभे राहते. मात्र, आज सांगोल्यात चक्क वैकुंठभूमीत एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे.
सांगोला शहरालगतच्या वाढेगाव नाका येथील स्मशानभूमीत आज मसणजोगी कुटुंबातील उच्चशिक्षित तरुण-तरुणीचा विवाह पार पडला. पूजा आणि संतोष अशी त्यांची नावे आहेत. पूजा ही लक्ष्मण राजाराम धनसरवाढ यांची मुलगी आहे. तर संतोष हा मंठा तालुक्यातील हदगाव येथील रहिवासी आहे.
लग्न म्हटले, की डोळ्यांसमोर उभा राहतो झगमगाट; या जोडप्याने चक्क स्मशानात बांधली रेशीमगाठ स्मशानभूमीत लग्न, म्हणजे सामान्य माणसाच्या कल्पनेबाहेरची गोष्ट. काळ बदलला असला आणि भारताची डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल चालू असली तरी, मसणजोगी समाज आजही आपली गुजराण स्मशानभूमीच्या परिसरातच करतो. तो येथेच राहतो, वावरतो. त्यामुळे त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन नव्हतीच. कुतूहल होतं ते गावात राहणाऱ्या मंडळींना. यामुळे हा विवाह सोहळा पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर आले होते.
पार पडलेल्या या आजच्या विवाहातील वधू-वर हे उच्चशिक्षित आहेत. यामुळे या विवाह सोहळ्याला अधिक महत्व आहे. हा विवाह सोहळा सध्या तालुक्यात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.