सोलापूर - भारतीय जनता पार्टी आता सरकार पाडण्यासाठी वेळ आणि तारीख सांगणार नाही, सरकार पाडण्याची थेट कृती करेल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. भाजपा नक्कीच राज्यात सत्ता स्थापन करेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. आणखी खूप निवडणुका बाकी आहेत. महाविकास आघाडीने एक निवडणूक जिंकली आहे. मात्र, मुख्य लढाई बाकी आहे, असे प्रवीण दरेकर बार्शी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची राज्य सरकारवर टीका महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विसंवाद -
महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत संघर्ष आहे. मोफत वीज बिलासाठी किंवा वीज बिल माफीसाठी राज्यात वणवा पेटला आहे. मात्र, वीज बिल माफीसाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत. शिवसेनेचे मंत्री परब यांना एसटीसाठी 1 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाते. तर दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्याला निधीही दिला जात नाही. म्हणून हे विसंवादाचे सरकार आहे, अशी टीका यावेळी प्रवीण दरेकर यांनी केली.
महाविकास आघाडीचे सरकार आपोआप पडेल -
महाविकास आघाडीचे सरकार आपोआप पडेल, असे प्रवीण दरेकर यापूर्वी म्हणाले होते. राज्यात अनैतिकपणे तीन पक्ष मिळून एकत्र आलेले सरकार जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. वर्षभरात महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत असून त्यातून निर्माण झालेल्या अविश्वासामुळे हे सरकार पडणार आहे. आम्ही या सरकारला पाडण्याची गरज नाही, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला होता.
वीज बिलावरून विसंवाद..
वीज बिलासंदर्भात काँग्रेस नेत्यांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या संदर्भाने केलेली वक्तव्ये म्हणजे पक्षांतर्गत विसंवाद दर्शविणारी आहेत. सरकारच्या या तिन्ही पक्षात एक वाक्यता नसल्याचे दिसून येते, अशी टीका दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली होती.