पंढरपूर :राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कारभार लोकाभिमुख नसून कोणत्याही मंत्र्यांची विकेट घेण्याची आम्हाला गरज नाही चौकशी एजन्सी आपलं काम करत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. महाविकास आघाडी सरकार हे प्रत्येक गोष्टीमध्ये बहाणेबाजी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
अजितदादांकडे फक्त बारामतीसाठी तिजोरीच्या चाव्या
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी आले असता अजित पवार यांनी राज्याच्या तिजोरीच्या आपल्याकडे असल्याचे सांगितले होते. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी या चाव्या पंढरपूरसाठी नसून फक्त बारामतीसाठी असल्याची टीका केली.
राज्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची कमतरता
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात कोरोना रुग्णांची संख्याही सर्वात जास्त आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या बेडची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. तरी राज्य सरकारने योग्य ती पावले उचलण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
महाविकास आघाडीमुळे ओबीसी आरक्षण संकटात
महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर ओबीसींची जनगणना करण्यास सांगितले होते. मात्र राज्य सरकार याबाबत गंभीर दिसत नाही. याबाबत राज्य सरकारबरोबर बैठक घेण्यात आली. मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. महाविकास आघाडीच्या कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींच्या जागांना स्थगिती मिळण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.