सोलापूर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. त्यामुळे शेतकरी मोठा अडचणीत आला आहे. शेतात शेतमाल तयार आहे. मात्र, त्याची खरेदी करण्यासाठी कोणी व्यापारी येत नाही. बाजारही समितीही बंद आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होत आहे.
काढणीला आलेले कलिंगड होतायेत खराब हेही वाचा-COVID-19 : भारताने गाठला चार हजार रुग्णांचा टप्पा; बळींची संख्याही शंभरहून अधिक..
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी येथील शेतकरी संगप्पा यांनी दोन महिन्यापूर्वी अडीच एकर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड केली. मोठ्या कष्टाने कलिंगडाची जोपासना केली. बंकलगी सारख्या कायम दुष्काळी असलेल्या आणि पाण्याची वानवा असलेल्या भागांमध्ये त्यांनी उत्तम प्रकारे कलिंगडाचे पीक घेतले. ते आता काढणीला आले आहे. मात्र, लाॅकडाऊनमुळे संगप्पा अडचणीत सापडले आहेत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने 14 एप्रिल पर्यंत लिलाव न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजारात कलिंगड घेऊन जाता येत नाहीत. तर दुसरीकडे व्यापारी देखील कलिंगड घ्यायला तयार नाहीत. अशातच संगप्पा यांचे चिरंजीव यांनी स्वतःहून सोलापुरात कलिंगडाची विक्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलीस शहरात येऊ देत नाहीत.
अडीच एक्कर कलिंगडासाठी संगप्पा यांनी दीड लाख रुपये खर्च केला आहे. हा खर्च बियाणी मल्चिंग पेपर, खत औषधं यावर झालेला आहे. त्यामध्ये मजुरांचा खर्च पकडलेला नाही. आता काढणीला आलेले कलिंगड शेतातच खराब व्हायला सुरुवात झाली आहे. किमान खर्च तरी निघेल या अपेक्षेने संगप्पा यांच्या कुटुंबातील मुले कलिंगड घेऊन सोलापूर शहरात येऊन विक्री करण्याचा विचारात आहेत. मात्र, पोलीस प्रशासन सोलापूर शहरात येऊ देत नाहीत.
शेतीमाल शहरात येऊ द्या, असे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले असले तरीही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पोलिसांपर्यंत पोहोचले नसावेत. त्यामुळेच पोलीस काटेकोरपणे त्यांचे कर्तव्य बजावत असताना, सोलापूर शहरात शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना देखील प्रवेश देत नसल्याचे चित्र सोलापुरात पाहायला मिळत आहे.