सोलापूर- रमजानमध्ये विविध फळांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. कलिंगड आणि खरबूज अशा पाणीदार फळांचा वापर इफ्तारवेळी करण्यात येतो. कलिंगडाच्या वाढत्या मागणीमुळे कलिंगडाला 'अच्छे दिन' आले आहेत. सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यातही पाण्याचे योग्य नियोजन आणि बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करून रमजान महिन्यांमध्ये कलिंगड शेतीतून चांगले उत्पादन घेतले आहे. माढा तालुक्यातील घाटणे गावातील राजकुमार पाटील या शेतकऱ्याने 10 एकर क्षेत्रावर 80 हजार कलिंगडांच्या रोपांची लागवड करून चांगले उत्पन्न घेतले आहे.
माढा तालुक्यातील घाटणे या गावातील राजकुमार पाटील हे प्रगतशील शेतकरी आहेत. पाटील यांच्या शेतात उसाचे पीक होते. मात्र, सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे उसाचे पीक जगवणे अवघड होऊन बसले होते. माढा तालुक्यातील घाटणे हे गाव अधिक प्रमाणात विहीर बागायतीचे गाव आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे विहीर आणि बोरचे पाणी कमी झाले. पाटील यांनी योग्यवेळी निर्णय घेत उसाचे पीक बाजूला ठेवत कमी पाण्यावर कलिंगडाची लागवड केली. कलिंगडाची लागवड करत असताना रमजान महिना डोळ्यासमोर ठेवून 55 ते 60 दिवसांमध्ये कलिंगड तयार होणाऱ्या 'शुगर क्वीन' या जातीच्या रोपांची लागवड पाटील यांनी केली.