पंढरपूर(सोलापूर)- उजनी धरण परिसरात आणि भीमा नदीच्या क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने भीमा नदीला पूर आला आहे. भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने चंद्रभागेवरचा जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच पात्रातील काही मंदिरे ही पाण्याणे वेढली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकार यांनी दिली.
भीमा नदी दुथडी वाहू लागल्याने सतर्कतेचा इशारा, जुना दगडी पूल पाण्याखाली
उजनी धरण परिसरात दमदार पाऊस झाला असल्याने उजनी धरणातून सोळा दरवाजे 0.53 मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे 30 हजार क्युसेक पाणी भीमा नदीत मिसळत आहे. त्याचबरोबर नीरा नदीतूनही भीमा नदीत पाणी मिसळत आहे. त्यातच भीमा नदी परिसरात दमदार पाऊस झाला असल्याने भीमा नदीची पाणी पातळी वाढू लागली आहे.
नीरा नदीतूनही भीमा नदीत पाणी मिसळत आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. यात भर म्हणून गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूर, सांगोला, माळशिरस भागात अतिवृष्टी झाली असल्याने कासाळ ओढा तसेच इतर लहान-मोठे ओढे भरुन वाहात आहेत. या ओढ्यांचे पाणीदेखील भीमा नदीत मिसळत आहे. यामुळे चंद्रभागेवरील दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच चंद्रभागेच्या घाटांच्या पायर्या आणि पात्रातील मंदिरे देखील पाण्यात आहेत.
भीमा नदीवरील मुंढेवाडी ते अजनसोंड यादरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेला असल्याने या बंधार्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भीमा नदीकाठच्या सखल भागातील ओढ्यांव्दारे पाणी मागे सरकू लागले असल्याने ऊस पिके पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली असल्याने प्रशासनाच्यावतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.