सोलापूर - उजनी धरणात सुमारे 1 लाख 25 हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
पूरसदृश परिस्थिती टाळण्यासाठी धरणाच्या कालव्याद्वारे 800 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. उद्यापासून हे प्रमाण 2000 क्युसेक पर्यंत वाढणार असून, यामध्ये वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे भीमा नदीला पूर आला आहे.
धरणाच्या कालव्याद्वारे 800 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. पुण्यातील सर्व धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने यांमधून उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. दौंड येथील विसर्गातून उजनीत सुमारे एक लाख 25 हजार क्युसेक वेगाने पाणी मिसळत आहे. यामुळे दररोज जवळपास 18 टीएमसी पाणी धरणात येत असून, हा वेग कायम राहिल्यास येत्या चार ते पाच दिवसांमध्ये उजनीत शंभर टक्के पाणीसाठा होईल. या धरणाची क्षमता 121 टीएमसी आहे.
तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून सुमारे 42 हजार क्युसेक पाणी सोडल्याने पंढरपूरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे अनेक मंदिरे पाण्याखाली जाऊ लागली आहे.