पंढरपूर - हनुमान जन्मभूमी कुगाव, पंढरपूर, इंदापूर, पुण्याचा प्रवास स्वस्तात आणि जलद व्हावा म्हणून उजनी धरणातून (Ujjani dam) विमानसेवा सुरू (Water aerodrome project) करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून धरणातील तीन ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. त्यातील दोन ठिकाणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीची ठरणार आहेत. त्यामुळे इंदापूरजवळील कालठण हे ठिकाण निश्चित करण्यात आले असून, तसा अहवाल नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे.
खासदार सुप्रिया सुळेंचा पुढाकार -
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीनुसार उजनी धरणातून विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर धरणाच्या दरवाजाजवळ एक ठिकाण विमानसेवेसाठी उत्तम आहे. मात्र, धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणावरून धरणाजवळ परवानगी देता येणार नाही, असे उजनी जलाशय व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. तर कुंभारगाव परिसरातील ठिकाणी परदेशातून विविध पक्षी येतात आणि त्या ठिकाणी पक्षी निरीक्षण केंद्र आहे. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून त्यांच्या अहवालाचा अभ्यास करून त्यांच्याकडून पुन्हा स्वतंत्रपणे पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही सांगण्यात आले. तत्पूर्वी, त्याला उजनी जलाशय (जलसंपदा) आणि पर्यावरण विभाग व एअर ट्राफिक कंट्रोल विभागाची मान्यता घ्यावी लागणार आहे.