पंढरपूर (सोलापूर) -पंढरपुरातील कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचे आणि भागवताचार्य म्हणून प्रसिद्ध असलेले वासुदेव नारायण उर्फ वा.ना. उत्पात यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते 80 वर्षांचे होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात चार मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
वा.ना. उत्पात यानी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. विठ्ठल मंदिरात 25 वर्षे त्यांनी श्रीमद भागवत कथा आणि रुक्मिणी स्वयंवर कथेचे वाचन केले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. तसेच सावरकर साहित्याचा प्रसारही केला. सावरकरांच्या विचाराचे साहित्य संमेलन सुरू करण्याची संकल्पना त्यांचीच होती. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भुषविले होते. वा.ना. उत्पात हे पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण व आध्यात्म क्षेत्रातील प्रमुख नाव असून पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भुषविले होते.