पंढरपूर (सोलापूर) -राज्य सरकारने राज्यातील टाळेबंदी 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. त्यामुळेच 22 फेब्रुवारीला पंढरपूर येथे माघी एकादशी यात्रानिमित्ताने पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करू नये. म्हणून 22 व 23 फेब्रुवारी विठ्ठल मंदिर मुखदर्शनासाठी बंद असणार आहे. कोणत्याही भाविकाला या दोन दिवसांमध्ये मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंद
औसेकर महाराज म्हणाले, कोरोनाचे संकट अद्याप कमी झाली नाही. त्यामुळे आषाढी-कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. त्याचप्रमाणे माघी यात्रेलाही दोन दिवस भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. माघी दशमी आणि एकादशी या दोन दिवशी गर्दी होऊ नये म्हणून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मात्र. द्वादशी दिवशी विठ्ठल मंदिर पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.