पंढरपूर (सोलापूर) -कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असणारे विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे अन्नछत्र पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. वारकरी व भाविकांनी अन्नछत्रामध्ये महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.
हेही वाचा -गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची वेळापूर पोलीस ठाण्यास भेट
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांना महाप्रसाद मिळावा या हेतूने संत तुकाराम भवन येथे अन्नछत्र चालवले जाते. सदरचे अन्नछत्र सन 1996 पासून भाविकांच्या सेवेत आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. शासन आदेशान्वये राज्यातील सर्व मंदिरे 7 ऑक्टोबर 2021 पासून भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर, इतर सर्व देवस्थानमध्येही अन्नछत्रालय सुरू केलेली आहेत. विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे देखील अन्नछत्र सुरू करावे, अशी भाविकांकडून मागणी होत होती. भाविकांची मागणी विचारात घेऊन, मंदिर समितीने श्री. संत तुकाराम भवन येथील अन्नछत्र 19 फेब्रुवारी 2022 पासून पूर्ववत सुरू करण्याचा नुकताच 13 फेब्रुवारीच्या मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेतला होता. त्यानुसार श्री. संत तुकाराम भवन येथील अन्नछत्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेवून 19 फेब्रुवारी, 2022 पासून पूर्ववत सुरू करण्यात आले असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले आहे.