सोलापूर -आषाढी एकादशीनिमित्त परंपरेप्रमाणे विठ्ठल-रुक्मिणीची शहरातील नगर प्रदक्षिणा मार्गावरून रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेचे दर्शन घेण्यासाठी नगरप्रदक्षिणा मार्गावर वारकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
पांडुरंगाच्या रथाची नगर प्रदक्षिणा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल होत असतात. मात्र, प्रत्येकालाच विठ्ठलाचे दर्शन घडेलच असे नाही. काहीजणांना सावळ्या विठुरायाचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन विठ्ठल चरणी माथा ठेवता येतो. मात्र, लाखो वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घडत नाही. अशा वारकऱ्यांसाठी नगर प्रदक्षिणा मार्गावरून विठ्ठलाचा रथ काढला जातो.
रथयात्रा सुरू होण्यापूर्वी विठ्ठल, राही आणि रुक्मिणी यांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर विधीवत पूजा करण्यात आली. नातू रानडे आणि देवघर या रथावरील मानकर यांनी विठ्ठल, राही आणि रुक्मिणीच्या मूर्ती रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथावर ठेवल्या. त्यानंतर पंढरपुरातील माहेश्वरी धर्मशाळेपासून शुक्रवारी दुपारी रथयात्रेस सुरुवात झाली. रथयात्रा प्रदक्षिणा मार्गावरून फिरवण्यात आली. वारकऱ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी रथयात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी केली होती.
रथयात्रावर खारीक उधळण्याची परंपरा आहे. त्यामुळे या परंपरेनुसार रथावर खारीकची उधळण होताना पाहायला मिळाले.