पंढरपूर -कार्तिकी वारीमध्ये 25 ते 27 नोव्हेंबर रोजी विठ्ठल-रखुमाईचं मुखदर्शन वारकरी व भाविकांसाठी बंद राहणार आहे. मात्र, 23 ते 24 नोव्हेंबर रोजी ऑनलाइन बुकिंग करून विठ्ठलाचे मुखदर्शन भाविकांना घेता येणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर कार्तिक वारीसाठी वारकऱ्यांनी पंढरपूरमध्ये गर्दी करू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
वारकरी व भाविकांची वाढती मागणी लक्षात घेऊन मंदिर समितीने 23 ते 24 नोव्हेंबर रोजी ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांना विठ्ठल-रखुमाईच्या मुखदर्शनाची परवानगी दिली. एका तासाला 200 याप्रमाणे दिवसभरात दोन हजार नागरिकांना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. तर 25 ते 27 नोव्हेंबर रोजी प्रतीकात्मक व साध्या पद्धतीने कार्तिकी सोहळा मंदिर समितीकडून पार पाडण्यात येणार आहे. या तीन दिवसात मंदिर बंद राहणार आहे.
देशात तसेच राज्यात कोरोना महामारी प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे कार्तिकी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. विठू नगरीमध्ये 25 ते 26 नोव्हेंबर रोजी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या गावात संचार बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पांडुरंगाचे मुखदर्शन मंदिर समितीकडून बंद करण्यात आले आहे.
एक हजार भाविकांनी घेतले दर्शन -
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्याची परवानगी राज्यशासनाने दिली होती. त्यामुळे विठ्ठल-रखुमाई मंदिर वारकरी व भक्तांसाठी मुक्त दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. मात्र, त्यासाठी ऑनलाइन बुकिंग करणे गरजेचे होते. पहिल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळत एक हजार भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता आले, त्यानंतर ती संख्या वाढून मंदिर समितीने दोन हजार भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली होती.