करमाळा(सोलापूर)- जिल्ह्याच्या बहुतेक भागात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून होणारी भाज्यांची आवक वाढली आहे. विशेषत: पालेभाज्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे दर मात्र कमी झाले आहेत.
कोरोना संसर्गामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आठवडा बाजार अद्यापही बंद आहेत. भाजीविक्रेते गावात घरोघरी जाऊन भाज्या विकत आहेत. उन्हाळ्यात भाज्यांची आवक घटली होती. त्यामुळे ५ रुपये पेंडीचा दर १५ ते २० रुपये झाला होता. यामध्ये मेथी,पालक,कोथिंबीर यांची दर वाढले होते.
गेल्या आठ दिवसात भाज्यांची आवक वाढली असून पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत. सध्या मेथी,पालक ५ ते १० रुपयांना पेंडी मिळत आहे. फळभाज्यामध्ये दोडका, वांगी, भेंडी, मिरची, कारली,घेवडा यांचे दर ५०ते ६० रुपये किलोवर स्थिर आहेत. गवार मात्र ६० ते ७० रुपये किलोने विक्री होत आहे.कोबी फ्लॉवर १० ते १२ रुपये गड्डा आहे. बटाटा ३५ ते ४० रुपये किलोवर गेला आहे.
कोथिंबिरीचे भाव वाढले
"आकाडाच्या (आषाढ) पार्श्वभूमीवर कोथिंबीरीला मागणी वाढली आहे.मागणीच्या मानाने कोथिंबिरीची आवक कमी होत असल्याने कोथिंबिरीचे भाव मात्र वाढले आहेत.सध्या कोथिंबिरीची एक पेंडी १० ते १५ रुपये दराने विकली जात आहे".