पंढरपूर (सोलापूर) - मंदिरे खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंढरपुरात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांसह मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली. यानंतर प्रकाश आंबेडकरांसह नऊ जणांना मंदिरात प्रवेश देण्यात आला असून त्यांना विठ्ठलासह रुक्मिणीचे मुखदर्शन देण्यात आले. यानंतर प्रशासन आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर पुढील आठ दिवसात राज्यातील मंदिरे खुली करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असून आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले.
प्रकाश आंबेडकारांची प्रतिक्रिया आंदोलनाच्या संदर्भात प्रकाश आंबेडकर ट्वीट करुन म्हणाले, 'सरकार जर निर्णय घेत नसेल तर जनतेने निर्णय घ्यायचा असतो. सरकारने सुरुवातीलाच वारकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर आंदोलनाची वेळ आली नसती. संजय राऊतांनी आजच्या आंदोलनावर केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा अभ्यास पूर्ण नाहीये. लोकशाहीत सरकारने कृती केली नाही की, जनता ती करते.'
पंढरपूरच्या सर्व सीमा आणि विठ्ठल मंदीर परिसरात मोठा फौजफाटा पोलिसांमार्फत तैनात करण्यात आला आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. शासनाच्या विरोधत वंचित व वारकरी सेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही काळ पोलीस आणि कार्यकर्त्यांमधे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या आंदोलनानंतर आठ ते दहा दिवसात मंदिर उघडण्याची शक्यता आहे. मात्र, स्पर्श दर्शनाला अजून ४ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया काय म्हणाले होते संजय राऊत -
'मंदिरांना इतक्या महिन्यानंतरही टाळं लागणं हे काही आनंदाने केलेलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण सरकार हे टप्प्याटप्याने अनेक गोष्टी सुरू करत आहे. भविष्यात लवकरच मंदिरं, रेल्वे सुरू होण्यासंदर्भात चर्चा होईल. विरोधी पक्षांनी थोडा संयम बाळगला तर महाराष्ट्राच्या जनतेवर उपकार होतील. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात जी गर्दी जमवली आहे ती रेटारेटी सुरु आहे,' असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.