पंढरपूर - अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या मुर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेपनाची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. सिलिकॉन रेझिंग आणि विशिष्ट द्रव्य पदार्थाचे लेपन विठ्ठलाच्या मूर्तीला लावण्यात आले. औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली. वज्रलेपनानंतर सावळ्या विठोबाच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने शासनाच्या न्याय व विधी खात्याकडे विठ्ठल आणि रूक्मिणी मूर्ती संवर्धनासाठी वज्रलेप करण्याची परवानगी मागितली होती. यानंतर वज्रलेपनासाठी मान्यता देण्यात आली. ही प्रक्रिया मंगळवारपासून सुर करण्यात आली होती. ती बुधवारी पूर्ण झाली. या वज्रलेपनामध्ये मुर्तीला सिलिकॉन रेझिंग आणि विशिष्ट द्रव्य पदार्थाचे लेपन लावण्यात आले. या लेपनामुळे मूर्तीचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.