बार्शी (सोलापूर) - कोरोना रुग्णसंख्या वाढीचा परिणाम आता आरोग्य यंत्रणेवर होऊ लागला आहे. शिवाय ग्रामीण भागातील रुग्ण अधिकच्या संख्येने समोर येत आहेत. त्यामुळे आता कृषी उत्पन्न बाजार समितीत 100 बेडचे सेंटर उभे केले जाणार आहे. त्याअनुषंगाने प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरच केंद्र सुरू होणार असल्याचे बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांनी सांगितले आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद आहे. त्यामुळे भाजीपाला मार्केटच्या परिसरात 100 बेडचे कोविड सेंटर उभारले जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, हमाल, गरीब रुग्ण यांना होणार आहे. कोविड सेंटर सुरू झाल्यानंतर या ठिकाणी साफसफाईसाठी कामगार, सॅनिटायजर, मास्क, थर्मा मीटर, हँडवॉश यासारखे साहित्य पुरविले जाणार आहे. याशिवाय औषधे, चहा, जेवण उपचारादरम्यान रुग्णांना दिले जाणार आहार. बाजार समितीचा परिसर हा प्रशस्त असून या ठिकाणी 15 शौचालये देखील आहेत. त्यामुळे रुग्णांची गौरसोय होणार नसल्याचे सभापती रणवीर राऊत यांनी सांगितले. यावेळी संचालक रावसाहेब मनगिरे, मेडिकल असोसिएशनचे तालुका अध्यक्ष सुधीर राऊत हे उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने जिल्हा उपनिबंधक यांना पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. शिवाय आ. राजेंद्र राऊत यांनी देखील कोविड सेंटर सुरू करण्याबाबत बाजार समितीला पत्र दिले आहे. बार्शी शहरात केवळ तालुक्यातूनच नाही तर भूम, परांडा, वाशी या उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून लसीकरण मोहीम सुरू होत आहे. 18 वर्षापेक्षा अधिकच्या तरुणांना ही लस घेता येणार आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी लसीकरण देखील सुरू केले जाणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची परवानगी मिळताच हे कोविड सेंटर सुरू होणार आहे.