सोलापूर - शहरी महिलांना नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करता यावा म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने 'उंच माझा झोका' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने हा सामूहिक नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला.
नागपंचमीनिमित्त सालोपूरमध्ये महिलांसाठी 'उंच माझा झोका' उपक्रमाचे आयोजन
शहरी महिलांना नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करता यावा म्हणून सोलापूर महानगर पालिकेच्यावतीने 'उंच माझा झोका' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित सर्वपक्षीय महिला नगरसेविकांनी नागपंचमीनिमित्त गाण्यांवर फेर धरत उपक्रमाचा आनंद लुटला. भारतीय महिलांच्या आस्थेचे प्रतीक असणारा श्रावण महिन्यातील हा सण सांस्कृतिक वारसा आहे. त्याची जपणूक करण्यासाठीच आपण हा उपक्रम घेतल्याचे महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कुमुद अंकाराम यांनी सांगितले. तर महापौरांनी यांसारखे उपक्रम आपण कायम ठेवणार असल्याचे म्हटले आहे.
नागपंचमी निमित्त झोके बांधण्यासाठी शहरात आता पूर्वीसारखी भली मोठी झाडे नाहीत. त्यात करमणुकीची साधने वाढल्यामुळे पारंपरिक सण-उत्सवांकडे महिलांचा ओढा कमी झाला आहे. अशा परिस्थितीत सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उपक्रमामुळे कृत्रिम सांगाडे लावून साजरी झालेली नागपंचमी महिलांच्या आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली आहे.