सोलापूर -सोलापूर विजयपूर महामार्गावर दोन भाजी विक्रेत्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी पहाटे 5 ते 5.30 दरम्यान झाला आहे. हे दोघे भाजी विक्रेते ग्रामीण भागातील रहिवासी असून, मार्केट यार्डमधून भाजी विकत घेऊन इतर खेडेगावात जाऊन ते भाजी विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. पण, आज पहाटे काळाने घाला घातला असून, दोघे अपघातात चिरडले गेले. सत्तार गुलाब मुल्ला(वय 35 रा, वाडकबाळ) आणि यासिन शेख (वय 30 रा. वाडकबाळ) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
दोन भाजी विक्रेते अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार; सोलापूर-विजयपूर महामार्गावरील घटना - solapur today accident news
सोलापूर विजयपूर महामार्गावर दोन भाजी विक्रेत्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी पहाटे 5 ते 5.30 दरम्यान झाला आहे.
शनिवारी पहाटे सत्तार मुल्ला व यासिन शेख हे सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती(मार्केट यार्ड) मध्ये भाजी खरेदीसाठी आले होते. भाजी खरेदीकरून गावाकडे परत (एमएच 13 झेड 6873) या दुचाकीवरून जात असताना विजयपूर(विजापूर) महामार्गावर असलेल्या जकात नाक्याजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. पहाटेची वेळ असल्याने महामार्गावर शुकशुकाट होता. कोणीही धडक दिलेल्या वाहनास बघितले नाही.
अपघात एवढा भीषण होता की, त्या अज्ञात वाहनाने दोघा भाजी विक्रेत्यांना फरफटत नेले. त्यामुळे शरीर छिन्नविच्छिन्न झाले होते. रस्त्यावर पालेभाज्या व इतर शेतीमाल विखुरलेल्या अवस्थेत पडला होता. अपघात झाल्यावर काही वेळाने विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. उत्तरीय तपासणीसाठी दोघा भाजी विक्रेत्यांचे शव पोस्टमार्टेमसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दोघांची ओळख पटली आणि त्यांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती कळवली. माहिती मिळताच वाडकबाळ येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती. या अपघाताची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. चौकशीनंतर वाहनाचा शोध लागेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.