सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात मॉब लिंचिंगची धक्कादायक घटना घडली आहे. येथे दोन जणांना 10 ते 15 जणांच्या टोळक्याने मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एकाची प्रकृती गंभीर : वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आहेरवाडी येथे 1 जुलै रोजी दुपारी गोहत्येच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात तसेच गोहत्या करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या दोघांना सोलापूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्या डोक्यात खोलपर्यंत जखमा झाल्या आहेत.
लोखंडी सळईने मारहाण केली : गुडूलाल मशाक शेख (वय 39 वर्ष) आणि सिराज नजीर पटेल या दोघांना जबर मारहाण करण्यात आली आहे. जखमी गुडूलाल यांनी वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार 1 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास ते आहेरवाडी येथील त्यांच्या शेतात आले होते. त्यावेळी तेथे गावातील काही तरुण आले आणि त्यांनी केलेल्या कृत्याचा जाब विचारत शिवीगाळ करू लागले. त्यानंतर त्यांनी गुडूलाल व सिराज पटेल यांना लाकडाने व लोखंडी सळईने मारहाण करण्यास सुरुवात केली.