सोलापूर- सोलापूर शहर आणि ग्रामीण मिळून कोरोनाबाधितांची संख्या आता 4 हजार 941 वर पोहोचली आहे. शुक्रवारी सोलापूर शहरात 20 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर ग्रामीणमध्ये 212 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 359 वर पोहोचली आहे. सोलापूर ग्रामीण भागात शुक्रवारी कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले.
सोलापूरातील ग्रामीण नगरपालिका व इतर गावांतील 979 चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात मोठी तपासणी संख्या आहे. यात 767 निगेटिव्ह तर 212 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यात 126 पुरुष तर 86 महिलांचा समावेश आहे. शुक्रवारी एकाही मृत्यूची नोंद ग्रामीण भागात झाली नाही तर एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे.
सोलापूर शहराचा आढावा घेतला असता 490 अहवाल प्राप्त झाले आहेत.त्यामधून 470 अहवाल निगेटिव्ह तर फक्त 20 रुग्णांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे.शुक्रवारी शहरात 4 बाधित रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोलापूर शहरात 3557 रुग्ण बाधित झाले आहेत.तर एकूण 318 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर ग्रामीणमध्ये आत्तापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 1384 झाली आहे तर मृतांची संख्या 41 आहे. ग्रामीणमध्ये सध्या 883 जण कोरोना वर उपचार घेत आहेत तर 460 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे वाढती रुग्ण संख्या
सोलापूर शहरासह आजूबाजूच्या 31 गावांमध्ये कोरोना संसर्गजन्य आजाराची साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांच्या कडक संचारबंदी किंवा कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. गुरुवारी शहरात 212 रुग्ण वाढले होते तर शुक्रवारी ग्रामीण भागात 212 रुग्ण वाढले आहेत. सोलापूरात आजतागायत एकूण 4941 रुग्ण झाले आहेत.कोरोना विषाणूचा विळखा वाढतच चालला आहे.