सोलापूर- प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामासाठी वापरलेला कच्चा माल तपासणी करून देण्यासाठी फी सोबत अधिक रकमेची मागणी करणाऱ्या दोन अभियंत्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. 3 नोव्हेंबर) दुपारी कारवाई केली आहे. विषेश म्हणजे या दोघा संशयित लाचखोरांनी लाच ऑनलाइनरित्या एका खासगी व्यक्तीच्या बँक खात्यावर व स्वतःच्या बँक खात्यावर देखील लाच स्वीकारत होते.
सुवर्णा शिवाजी सगर (वय 32 वर्षे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कनिष्ठ अभियंता) आणि शिवराम जनार्दन केत (वय 49 वर्षे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण विकास रस्ते), अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
कनिष्ठ अभियंता सुवर्णा सगर यांनी तक्रारदारास बांधकाम माल तपासून देण्यासाठी ऑनलाइन साडे सहा हजार भरण्यास सांगितले होते. तडजोडी अंती उपअभियंता शिवराम केत यांनी 5 हजार रुपये भरण्यासाठी सांगितले होते. पण, बांधकामाचे साहित्य तपासण्यासाठी खरी फी ही 4 हजार 7 रुपये आहे. ग्राम सडक योजनेतील दोन्ही अभियंत्यांनी 993 रुपये अधिकची लाच ऑनलाइन रित्या स्वीकारले आहे. याबाबत ऑनलाइन लाच घेणाऱ्या दोघा अभियंत्यांविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपधीक्षक संजीव पाटील, जगदिश भोपळे व त्यांच्या पथकाने केली आहे.