सोलापूर -शुक्रवारी रात्री 8 वाजेपासून पुढील दोन दिवस शनिवार आणि रविवारी जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दोन दिवसांत शहर परिसरातील अत्यावश्यक सेवेत मोडणारे सर्व दुकाने चालू राहतील. मात्र सर्वसामान्य व्यक्तींना शहरात फिरता येणार नाही. विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल. अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे.
आज रात्री 8 पासून संपूर्ण शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. नागरिकांनी कारण असल्याशिवाय बाहेर पडू नये. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे. योग्य कारण असेल तरच घराबाहेर पडा, घरीच सुरक्षीत राहा असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सोलापूरमध्ये दोन दिवस कडक संचारबंदी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील
शनिवारी व रविवारी शहरामध्ये कडक संचारबंदी असणार आहे. मात्र या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवा सुरूच राहाणार आहेत. मुभा देण्यात आलेल्या दुकानदार, रिक्षा चालक, कारखानदार यांना तसेच अशा ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. संबंधित अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या मालक आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र दुकानात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रमाणपत्र नसल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला आहे.
हेही वाचा -रेमडेसिवीरच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश; दोघांना अटक, 272 इंजेक्शन जप्त