सोलापूर- सोलापूर शहरात दोन दिवसांची शिथिलता देण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने सोमवारी रात्री उशिरा दिली. रमजान सण जवळ असतांना कडक लॉकडाऊन लागू करत फक्त वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार आणि जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बंदी आणण्यात आली होती. पण यावर तीव्र विरोध होत झाल्याने अखेर प्रसाशनाने नरमाईची भूमिका घेत 11 व 12 मे रोजी सकाळी 7 ते 11 या वेळेत खरेदीसाठी सूट दिली आहे. याबाबत अधिकृत माहिती पालिका उपायुक्त जमीर लेंग्रेकर यांनी दिली.
दोन दिवसांची शिथिलता
सोलापूर जिल्हा प्रशासनाने व पालिका प्रशासनाने वाढती कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी किंवा कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 8 मे च्या रात्री 8 वाजल्यापासून ते 15 मे च्या सकाळी 8 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. यापूर्वी 5 एप्रिल पासून सोलापुरात कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लागू केले होते. मात्र, सकाळी 7 ते 11 पर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सूट देण्यात आली होती. लॉकडाऊन असतानाही एप्रिल महिन्यात शहर आणि जिल्ह्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेली होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आणखीन कडक निर्बंध लागू करत 8 मे पासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू केले होते. याला मुस्लिम समाजाने कडाडून विरोध केला होता. ऐन रमजान सणासमोर असे कडक लॉकडाऊन लागू करू नका, असे निवेदन दिले होते.