सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळी येथील अमित ढोले यांच्या शेतात काम करणाऱ्या सालगड्याच्या दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. अर्जुन हरिदास पोळ (वय 15 वर्ष) आणि आर्यन हरिदास पोळ (वय 9 वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत.
पोहायला जातो म्हणून दोन्ही मुलं शेततळ्याकडे गेली
अर्जुन आणि आर्यन हे दोघे सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास पोहायला जातो असे सांगून शेततळ्याकडे गेली. अर्जुन पोळ याला पोहता येत होते. म्हणून आईने देखील जाऊ दिले. पण, पाण्याची खोली अधिक होती. अर्जुन आणि आर्यन या दोघांनी शेततळ्यात उडी घेताच गटांगळ्या खाऊ लागले आणि बुडाले.
सालगड्याची दोन्ही पोरांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ
हरिदास पोळ व त्यांची पत्नी हे अमित ढोले यांच्या शेतात मजुरी करतात. अमित ढोले यांचे शेत हे कर्डेहळी येथे रोडलगतच आहे. आर्यनला पोहता येत नसल्याने तो पाण्यात उडी मारल्याबरोबर अर्जुनच्या गळ्यात जाऊन पडला आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. दोघे गटांगळ्या खाऊन बुडाले. ही बाब आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्याबरोबर त्यांनी दोघांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढले आणि अश्विनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.