पंढरपूर -मोडनिंब येथील जनावरांच्या बाजारामध्ये शेळी खरेदी-विक्रीच्या व्यवहारात शेतकऱ्याला बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्या दोन तरुणांकडून दोन हजार ते पाचशे रुपयांच्या 67 हजार रुपये मूल्यांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. सिद्धेश्वर कैंचे (वय 22 रा. सीना दारफळ ता. माढा) आणि धनाजी दाभाडे दाडे (रा.वाफळे ता. मोहोळ) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत, अशा प्रकार बनावट नोटा चलनात वापरण्याची जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे.
बनावट नोटा देऊन शेतकऱ्याची फसवणूक बनावट नोटा देऊन शेतकऱ्यांची फसवणूक
मोडनिंब येथील जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे. याठिकाणी सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी शेतकरी जनावरे विक्री-खरेदीसाठी येतात. त्यातून या बाजारामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र तालुक्यातील पोखरापूर येथील शेतकरी कुंडलिक लेंगरे हे दोन शेळ्या व सहा मेंढ्या घेऊन बाजारात आले. तिथे बकरी खरेदी करण्याच्या बहाण्याने सिद्धेश्वर कैंचे याने 32 हजार रुपयांना लेंगरे यांच्याकडून दोन शेळ्या आणि मेंढ्या खरेदीचा व्यवहारात ठरवला होता.
ठरलेल्या व्यवहारानुसार रक्कम देताना कैंचे याने लेंगरे यांना दोन हजार आणि पाचशेच्या नोटा दिल्या. मात्र, लेंगरे यांना त्या नोटाबाबत संशय आला असता, त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी शेळ्या मेंढ्या घेऊन जाणाऱ्या कैंचे आणि दाडे याला शेटफळ येथे अडवून चौकशी केली. त्यावेळी ते दोघे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी लगेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे 67 हजार रुपयांच्या बनावट आढळून आल्या, पोलिसांनी त्या नोटा जप्त करत दोघांनाही अटक केली.
बनावट नोटा देणारी टोळी सक्रीय
वैराग या बाजारामध्ये गेल्या आठवड्यामध्ये अशाच प्रकारची बनावट नोटा देऊन शेतकऱ्यांची फसवणूक झाली. याबाबत मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शनिवारी मोडनिंब येथील बाजारपेठेमध्ये बनावट नोटा देऊन शेतकऱ्याची फसवणूक केली. यामुळे अशा प्रकारची बनावट नोटा देऊन फसवणूक करणाऱ्यांची टोळी सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.