पंढरपूर -खेडभोसे येथून ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर पटवर्धन कुरोली येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात कोसळला. यामध्ये चालक सतीश कडाळे (रा. भोसे, ता. पंढरपूर) हा गंभीर जखमी झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यामध्ये ट्रॅक्टर व दोन ट्रॉलींसह उसाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात झालेला पाहून बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांनी चालकाला बाहेर काढले. त्याच्यावर पंढरपूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
शेतकऱ्यांचे दोन लाखाचे नुकसान
भोसे येथील शेतकरी धनाजी विठ्ठल साळुंखे यांचा ट्रॅक्टर ऊस घेऊन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे जात होता. पटवर्धन कुरोली बंधाऱ्यावर आल्यानंतर दोन्ही ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस भरल्याने उतारावर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. त्यामुळे तो सरळ बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात पडला. ट्रॅक्टर चालक तब्बल दोन तास उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली अडकून होता. या ट्रॅक्टरचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.