पंढरपूर(सोलापूर) -राज्यात कोरोनाचा कहर अद्याप संपला नाही. मात्र, काही ठिकाणचा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरराज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारपासुन सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तत्पूर्वी माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने घेतलेल्या कोरोनाच्या तपासणीत ग्रामीण भागात 10 हजार 799 शिक्षकाच्या अॅन्टीजेन प्रयोगशाळेत टेस्ट करण्यात आल्या. या पैकी तब्बल 178 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील अजूनही काही शिक्षकांचे कोरोना अहवाल येणे बाकी आहे, यात पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक तर त्या खालोखाल माळशिरस आणि मंगळवेढा तालुक्यातील शिक्षकांची संख्या मोठी आहे. पालकांनी संमतिपत्र द्यायला नकार देत मुलांना घरीच ठेवणे पसंत केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात पालकांची संमती नाहीच?
पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागातर्फे ग्रामीणमधील आरोग्य केंद्र व नगरपालिका क्षेत्रातील केंद्रात 114 ठिकाणी चाचणीची सोय केली होती. शुक्रवारी व शनिवारी सर्वाधिक म्हणजे 10 हजार 799 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अँटिजेन चाचण्या केल्या. यामध्ये 176 शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील 3 हजार 406 शिक्षकांमध्ये लक्षणे दिसल्याने आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. सोलापूर शहर- जिल्ह्यात सुमारे दीड हजार शाळांमध्ये सव्वालाख मुले नववी ते बारावीचे शिक्षण घेत आहेत. मात्र, आतपर्यंत 30 टक्केही पालकांनी संमतीपत्र दिलेले नाही.
सोलापुरातील शिक्षक निगेटीव्ह
सोलापूर शहरात १७ ते २१ नोव्हेंबरपर्यंत १ हजार १९९ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी ३३० अहवाल प्राप्त झाले असून सर्व शिक्षक निगेटीव्ह आहेत. उर्वरित ८६९ शिक्षकांचा अहवाल अद्याप यायचा आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडे आत्तापर्यंत अक्कलकोट व सांगोला तालुक्यातील अहवाल प्राप्त झाले आहेत. अक्कलकोटमध्ये ९४० चाचण्या घेण्यात आल्या, त्यात दोन शिक्षक पॉझिटिव्ह वाढवले आहेत. सांगोला मध्ये ८८१ चाचण्या घेण्यात आल्या, त्यात सहा शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. करमाळा तालुक्यात दोन शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. फक्त मंगळवेढा तालुक्यात दोन शिक्षक या चाचणीत पॉझीटीव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकांना त्रास होत असेल तर उपचारासाठी खास सुविधा करण्यात आली आहे, त्यांना आराम करण्यासाठी रजा दिली जाणार आहे.