सोलापूर - नणंदेच्या पतीला जेलमधून सोडवण्यासाठी पैसे आण, असे म्हणत विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करत तिचा गर्भपात केला. याबाबत विवाहित महिलेने विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये नणंद अर्चना सोनवणे, सासरे अशोक राणबा सितापराव, दीर आनंद अशोक सितापराव, पती प्रदूत अशोक सीतापराव, जाऊ शीतल आनंद सीतापराव, सासू सुनीता अशोक सीतापराव ( सर्व रा. शिवगंगा नगर, पारशी विहीर जवळ, सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. प्रज्ञा प्रदूत सीतापराव (सध्या रा. चंद्रलोक नगरी, सोलापूर) या विवाहित महिलेने तक्रार नोंदवली आहे.
प्रज्ञा हिचा विवाह 23 जून 2018 रोजी प्रदूत सीतापराव यासोबत धार्मिक रीती रिवाजाप्रमाणे झाला होता. नणंद अर्चना सोनवणे हिचा पती पैशाच्या अफरातफरीच्या केसमध्ये सध्या पुणे येथील जेलमध्ये आहे. त्यामुळे नणंदचा पती लग्नास येऊ शकला नाही. लग्नाच्या दीड महिन्यानंतर पती प्रदूत हा आपल्या पत्नीस (प्रज्ञा) भावजीला जेलमधून सोडवण्यासाठी माहेरून 3 लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावला होता आणि सतत मारहाण करून त्रास देत होता.
जुलै 2018 मध्ये पीडित विवाहिता प्रज्ञा ही गरोदर होती. परंतु संशयित आरोपींनी सासू, सासरा, नणंद, पती, दीर यांनी आत्ताच मूल नको, असे सांगत गर्भपात होण्याच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यामुळे प्रज्ञा हिचे गर्भपात झाले. डिसेंबर 2018 मध्ये सासू, सासरा, पती, नणंद, व दिराने पीडित विवाहितेस घरातून हाकलून दिले व माहेरून 3 लाख रुपये आणल्याशिवाय घरात घेणार नाही, अशी तंबी देखील दिली.